मालवण : (प्रतिनिधी)
मालवणच्या साहित्यविश्वासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या एका ऐतिहासिक क्षणाची साक्ष लवकरच मालवणकरांना घेता येणार आहे. येथील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित लिखित आणि मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या ‘आगीनझाड’ या गाजलेल्या कथासंग्रहाच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ‘आगीनझाड पंचविशी’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या सहकार्याने तसेच ऐलमा पैलमा अक्षर देवा सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने हा कार्यक्रम रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथील दादासाहेब शिखरे सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत साने गुरुजी वाचन मंदिरच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर, सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, खजिनदार शैलेश खंडाळेकर, साहित्यिक सुयोग पंडित, व्यवस्थापक संजय आचरेकर, ग्रंथपाल ऋतुजा केळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. ज्योती तोरसकर यांनी सांगितले की, “साधारणतः एखाद्या वास्तूचा, संस्थेचा किंवा व्यक्तीचा रौप्य महोत्सव साजरा केला जातो. मात्र एखाद्या पुस्तकाचा रौप्य महोत्सव साजरा करण्याची ही दुर्मीळ आणि प्रेरणादायी घटना आहे. ‘आगीनझाड’ हा कथासंग्रह आजच्या सामाजिक वास्तवाशीही तितकाच सुसंगत असून, नव्या पिढीपर्यंत तो पोहोचावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.”
या माध्यमातून नवोदित लेखक व कथालेखनाकडे वळणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “‘आगीनझाड’ या कथासंग्रहातूनच मी प्रथम कथालेखनाची वाट धरली. महाराष्ट्रभरातून या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद आणि मान्यवरांचे अभिप्राय आजही मनाला ऊर्जा देतात. आपल्या हयातीतच या पुस्तकाचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे, याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही.”
या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांच्या हस्ते होणार आहे. ॲड. अपर्णा परांजपे प्रभु कथा अभिवाचन करणार असून ‘आगीनझाडचे मराठी साहित्यामधील योगदान’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादात सुप्रसिद्ध अनुवादक वंदना करंबेळकर, कवयित्री व विधिज्ञ ॲड. अपर्णा परांजपे प्रभु, नाट्य व चित्रपट अभिनेते अभय खडपकर आणि कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात साहित्यिका वैशाली पंडित यांची विशेष मुलाखत डॉ. ज्योती तोरसकर घेणार असून, समारंभाच्या अध्यक्षपदी नमिता कीर उपस्थित राहणार आहेत.
मराठी साहित्याच्या इतिहासात एका पुस्तकाच्या पंचविशीचा साजरा करणारा हा अनोखा आणि स्मरणीय सोहळा साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनुभवावा, असे आवाहन डॉ. ज्योती तोरसकर आणि लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.





