स्त्री शिक्षणाच्या जननी व देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ येथील व्यापारी पतसंस्थेमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ‘सावित्री जन्मोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंच्या महान कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जमिनीवर साकारलेली सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब रांगोळी. या रांगोळीभोवती ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ असा प्रेरणादायी संदेश लिहून महिलांनी सावित्रीबाईंबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. पतसंस्थेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.
“आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आम्ही घराबाहेर पडून सन्मानाने काम करू शकतो. त्यांनी दिलेला शिक्षणाचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात महिलांचे योगदान अधिक मजबूत होत आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
सावित्रीबाईंच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा संकल्प करत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.





