मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाची ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर २०२६) च्या मुख्य स्पर्धेच्या (मेन ओपन फिल्म कॅटेगरी – कंटेंशन लिस्ट) यादीत निवड झाली आहे. थेट ऑस्करच्या सर्वसाधारण आणि प्रतिष्ठित श्रेणीमध्ये पात्र ठरणारा हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट ठरला आहे.
जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवड होत ‘दशावतार’ने बेस्ट पिक्चरसारख्या प्रमुख कॅटेगरीसाठी पात्रता मिळवली असून, त्यामुळे मराठी सिनेमाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकला आहे.
कोकणातील पारंपरिक ‘दशावतार’ लोककलेवर आधारित हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर आदी दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट केवळ समीक्षकांच्याच नव्हे, तर प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होता आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. कोकणातील दशावतार कलेच्या अंगाने फुलत जाणारी ही कथा कोकणच्या पर्यावरण रक्षणाची जागतिक पातळीवरची गोष्ट महाराष्ट्रासह अवघ्या देशात पसंतीची पावती घेणारी ठरली.
या ऐतिहासिक यशाबद्दल दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे,
“जगभरातील निवडक चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवणारा ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे. मराठी सिनेमा जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
‘दशावतार’ची निवड ही केवळ मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय प्रादेशिक सिनेमासाठी ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. हा चित्रपट आता अकॅडमी मेंबर्सच्या स्क्रीनिंगसाठी उपलब्ध झाला असून, पुढील टप्प्यात नामांकन आणि विजेतेपदाच्या शर्यतीतही तो सामील होण्याची शक्यता आहे.
या बातमीमुळे मराठी सिनेप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “मराठीचा झेंडा थेट ऑस्करपर्यंत पोहोचला!” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
‘दशावतार’च्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवे बळ मिळाले असून, भविष्यात आणखी मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर झळकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



