मालवण (प्रतिनिधी) :
प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज महिला शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या या मोलाच्या योगदानाची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आशा स्वयंसेविका सौ. सिद्धाली संतोष गावडे यांनी केले.
चौके ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच पी. के. चौकेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर यांनी करून उपस्थितांचे स्वागत केले.
सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना सौ. सिद्धाली गावडे यांनी महिलांच्या शिक्षणातून समाजपरिवर्तनाची चळवळ कशी उभी राहिली, याचे महत्त्व विशद केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर, अंगणवाडी सेविका सौ. सुकाळी, लिपिक सौ. सुविधा गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सुहासिनी परब, केंद्र संचालिका कु. मेघा वराडकर, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद सावंत, गुरुप्रसाद गावडे, विनित आंबेरकर, गावडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.





