सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी घडामोड आज घडली असून, खासदार नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून नाईट लँडिंग तसेच IFR (Instrument Flight Rules) ऑपरेशन्ससाठी अधिकृत परवाना मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या विमानतळावर २४×७, दिवस-रात्र, सर्व हवामानात सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
नाईट लँडिंग परवानगीमुळे रात्रीच्या वेळेतही विमानांचे उड्डाण आणि लँडिंग शक्य होणार असून, प्रवाशांना अधिक लवचिक व विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. ढगाळ वातावरण, पावसाळी परिस्थितीतही IFR प्रणालीमुळे उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे या मंजुरीचे मोठे वैशिष्ट्य आहे.
विमानतळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पार्किंग क्षमतेत वाढ करण्यात आली असून, पूर्वी ३ विमानांची असलेली क्षमता आता ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एकाच वेळी अधिक विमानांचे संचालन शक्य होणार आहे. डिसेंबर महिन्यातच सुमारे ११ हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असून, वाढत्या प्रतिसादामुळे सिंधुदुर्ग विमानतळ देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नाईट लँडिंग परवानगीसाठी खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या विद्युत पुरवठ्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, ज्यामुळे वीज व्यवस्था सक्षम झाली.
या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले. केंद्र सरकार, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि DGCA यांच्याशी राज्य सरकारकडून आवश्यक असलेला समन्वय, संवाद व पत्रव्यवहार वेळोवेळी करण्यात आला. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे आज चिपी विमानतळाला नाईट लँडिंगची अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन, व्यापार, उद्योग तसेच रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असून, कोकणच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे एक मैलाचा दगड ठरणार आहे.






