मुंबई, दि. प्रतिनिधी :
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २०६ येथील शिवसेना–भाजप–रिपब्लिकन महायुतीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसैनिक श्री. नाना आंबोले यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाला कुडाळ–मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नाना आंबोले यांना आगामी निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी नाना आंबोले यांच्या सामाजिक व विकासाभिमुख कार्याचा उल्लेख करत, ते प्रभाग २०६ मधील जनतेशी सातत्याने संपर्कात असलेले, तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणारे नेतृत्व असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, ही निवडणूक केवळ एका उमेदवारापुरती मर्यादित नसून, प्रभाग २०६ मधील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांची, विकासाची आणि उज्ज्वल भवितव्याची लढाई आहे. शिवसेना व महायुतीच्या माध्यमातून परिसरात सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना–महायुतीच्या बळावर प्रभाग २०६ मध्ये निश्चितच विकासाचा झेंडा फडकणार असून, जनतेचा विश्वास आणि पाठिंबा नाना आंबोले यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





