शिवसेना भवन, दादर येथे आज मुंबईतील शाखाप्रमुखांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. यावेळी उद्धवसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत, विशेषतः कोविड काळात राबवलेल्या जनसेवा कार्यक्रमांवर आधारित ‘मुंबई मॉडेल’ पुस्तकाचे जाहीर प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा) चे नेते, उपनेते, सचिव, खासदार, आमदार, विभागप्रमुख तसेच मुंबईतील सर्व शाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकजुट राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मुंबई ही आपली आई आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळवलेली मुंबई कुणाला विकू देणार नाही. युती असली तरी पक्षाची एकता आणि भगवा झेंडा कायम ठेवावा लागेल.
“‘मुंबई मॉडेल’ हे पुस्तक उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कोविड संकटकाळात राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांचे दस्तऐवजीकरण करते. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना हे पुस्तक जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाच्या कामगिरीची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले.मुंबई महापालिका निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, शिवसेना (उबाठा)-मनसे युतीने प्रचाराला वेग दिला आहे. या बैठकीने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असून, मुंबईत भगवा पुन्हा फडकावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.





