लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रकल्पाने इटलीतील बंद पडलेल्या मिटेनी एस.पी.ए. कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स वापरल्याच्या आरोपांमुळे पर्यावरणीय चिंता निर्माण झाली आहे.
२०१९ मध्ये लक्ष्मी ऑरगॅनिकच्या उपकंपनीने मिटेनीची मालमत्ता खरेदी केली होती. इटलीतील मिटेनी कंपनी पीएफएएस (पॉलीफ्लुरोअल्काइल सबस्टन्सेस) म्हणजे ‘फॉरएव्हर केमिकल्स’च्या उत्पादनामुळे गंभीर प्रदूषण प्रकरणात अडकली होती. २०१८ मध्ये कंपनी बंद पडली आणि २०२५ मध्ये त्यांच्या व्यवस्थापकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. या प्रदूषणामुळे इटलीतील व्हेनेटो प्रदेशात हजारो लोक प्रभावित झाले होते.लोटेतील प्रकल्पात हीच यंत्रसामग्री वापरली जात असल्याच्या दाव्यांमुळे स्थानिक आणि पर्यावरणवादी गटांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणासाठी संवेदनशील आहे. पीएफएएस रसायनांचे उत्पादन झाल्यास वाशिष्ठी नदी आणि भूगर्भातील पाण्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.एमपीसीबीने कंपनीला कडक अटींसह परवानगी दिल्याचा दावा केला आहे. सध्या कंपनीत नियमित उत्पादन सुरू नसून फक्त चाचणी बॅचेस घेतल्या जात आहेत. चाचण्यांतील कचरा तळोजा येथे सुरक्षित विल्हेवाटीसाठी पाठवला जात असल्याची माहिती आहे.
४ नोव्हेंबर रोजी एमपीसीबीने कंपनीला चाचण्यांचा अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली होती. हा अहवाल तज्ज्ञ समितीकडे पाठवून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले की, पीएफएएस रसायनांचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही. माध्यम रिपोर्ट्सनंतर एमपीसीबीकडे अहवाल मागवला असून, इटलीतील यंत्रसामग्रीला आवश्यक परवानग्या होत्या का याची तपासणी सुरू आहे.चौकशी पथक कंपनीतील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, पेटंट्स आणि परवान्यांची सखोल तपासणी करत आहे. नेमकी वस्तुस्थिती लवकरच स्पष्ट होईल, असे एमपीसीबी सूत्रांनी सांगितले. कंपनीनेही आपल्या प्रकल्पात पर्यावरण नियमांचे पालन होत असल्याचा दावा केला आहे.





