मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण व ज्ञानदा गुरुकुल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० डिसेंबर पासून येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय कला वाणिज्य आणि देशभक्त कै शंकरराव गव्हाणकर विज्ञान महाविद्यालय मालवण येथे प्लंबिंग तंत्रज्ञानाचे प्राथमिक कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज बांधकाम क्षेत्रामध्ये प्लंबिंग कामगारांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. या संधीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, प्लंबिंग क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी वळावे, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे, त्यांना उद्योगधंदा उभारून स्वतःच्या पायावरती उभे राहता यावे, या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत माफक अशी या प्रशिक्षणाची फी आहे. हे प्रशिक्षण दोन महिन्याचे असून त्यातील एक महिना मालवण व एक महिना पुणे अशाप्रकारे या प्रशिक्षणाचे स्वरूप असून दहावी पास विद्यार्थी ज्यांचे वय १८ ते ३० वर्षे आहे असे या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. सदर प्रशिक्षणासाठी वीस जागा असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर कुशे व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी केले आहे.





