रायगड | प्रतिनिधी
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील चैतन्य पाटील या तरुणाने अनोखा आणि धाडसी उपक्रम हाती घेतला आहे. महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी ४९० किमीचा पायी प्रवास केला असून, या दरम्यान ५९ धोकादायक ठिकाणे त्यांनी ओळखून काढली आहेत.
‘रस्ता सत्याग्रह पायी पाहणी मोहीम’
चैतन्य पाटील यांनी ‘रस्ता सत्याग्रह पायी पाहणी मोहीम’ या उपक्रमाची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी पळस्पे येथून केली. तब्बल २९ दिवसांहून अधिक काळ चाललेल्या या प्रवासात त्यांनी मुंबई–गोवा महामार्गावरील खड्डे, खराब रस्ते, अर्धवट राहिलेले काम, अपूर्ण सर्व्हिस रस्ते व पुलांची स्थिती यांचा सखोल अभ्यास केला.
फोटो, व्हिडिओ आणि जीपीएस टॅगद्वारे अहवाल
महामार्गावरील त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास याव्यात, यासाठी चैतन्य पाटील यांनी फोटो, व्हिडिओ आणि जीपीएस टॅगचा वापर करून सविस्तर अहवाल तयार केला आहे. या माध्यमातून धोकादायक ठिकाणांचे अचूक स्थान सहज ओळखता येणार असून, दुरुस्तीची कामे लवकर मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
अपघात रोखण्यासाठीचा प्रयत्न
या मोहिमेबाबत बोलताना चैतन्य पाटील म्हणाले की, “लहानपणापासून मुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि त्यावर होणारे अपघात मी पाहत आलो आहे. वाहनचालकांचा जीव जाऊ नये, अपघात टाळता यावेत यासाठीच हा पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला.”
केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचला अहवाल
चैतन्य पाटील यांनी तयार केलेला हा सविस्तर अहवाल खासदार अरविंद सावंत यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालामुळे मुंबई–गोवा महामार्गावरील धोकादायक ठिकाणांच्या दुरुस्तीस गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
एका तरुणाने समाजहितासाठी घेतलेला हा पुढाकार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, महामार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.



