महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पोलीस पाटील दिना’चे औचित्य साधून रामघाट–अणसुर येथील सातेरी मंगल कार्यालयात भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याला वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यातील पोलीस पाटलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीची घोषणा केली होती. सदर मदत नुकतीच पोलीस पाटील संघटनेकडे सुपूर्द करण्यात आली.
ही देणगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर यांच्या हस्ते वेंगुर्ले पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील बजावत असलेल्या भूमिकेचे कौतुक केले. गावपातळीवर शासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून, अशा स्नेहमेळाव्यांमुळे संघटनात्मक एकोपा वाढून कार्य अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पोलीस पाटील दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यामुळे पोलीस पाटलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





