मालवण (प्रतिनिधी) : मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून आचरा जिल्हा परिषद विभागातील विविध मूलभूत सुविधा व विकासकामांसाठी जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आचरा विभागातील तब्बल दहा महत्त्वाची विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी दिली.
मंजूर निधीतून प्रत्येक कामासाठी पाच लाख रुपये उपलब्ध होणार असून, त्रिबक आरेकरवाडी मळ्याकडे जाणारी पायवाट तयार करणे, वायंगणी पाटवाडी ते भटवाडी रस्त्याचे डांबरीकरण, वायंगणी नाका ते पाठवाडी रस्त्याचे डांबरीकरण, पळसंब गावठाणवाडी गोलतकर घर ते साकवापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे करण्यात येणार आहेत.
तसेच बांदिवडे पावणाई मंदिर ते रायकरवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, चिंदर बाजारपेठेतील नागोचीवाडी येथे स्मशानशेड बांधकाम, आचरा बंदर मुख्य रस्ता ते मेराशेवाडी मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण आणि आचरा पारवाडी सारमघर ते शिरसेकरघर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.
याशिवाय आचरा ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण तसेच आचरा मच्छी मार्केट इमारतीची दुरुस्ती या कामांचाही मंजूर निधीत समावेश आहे. त्यामुळे आचरा विभागातील रस्ते, नागरी सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तांच्या सुधारणेला चालना मिळणार आहे.
निधी मंजूर करून दिल्याबद्दल संतोष कोदे यांनी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले. विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख विनायक बाईत आणि जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांनीही महत्त्वपूर्ण पाठपुरावा केल्याचे कोदे यांनी सांगितले.
आचरा विभागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आगामी काळातही विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी मंजूर करून घेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वासही संतोष कोदे यांनी व्यक्त केला.
Files, images, and d






