मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुका नाभिक संघटनेच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बाजारपेठेतील भैरवी मंदिर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्यानिमित्त सकाळी ९ वाजता संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून, सकाळी ९.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद होईल. सकाळी १० वाजता ह.भ.प. धामापूरकर गुरुजी यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ३ वाजता बाळगोपाळ मंडळ, आचरा यांचे भजन होणार आहे. तसेच रात्री ८ वाजता विश्वकर्मी प्रासादिक भजन, राठीवडे यांचे भजन सादर करण्यात येणार आहे. या भजनामध्ये बुवा मंदार आचरेकर व बुवा अक्षय परुळेकर सहभागी होणार आहेत.
सोहळ्याच्या स्वागत समारंभासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात येणार आहे.
मालवण तालुका नाभिक संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई शाखा मालवण तसेच नाभिक समाजाच्या वतीने सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान, संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.






