मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडा दिनाचे औचित्य साधून ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. १७ वर्षांखालील १०० मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात वेदांत विनायक पोफळे आणि आराध्या बाळकृष्ण वाजंत्री यांनी द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
ओरोस येथे पार पडलेल्या या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वराडकर हायस्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी वेदांत पोफळे याने १७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सहभाग घेतला. याच वयोगटातील मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात आराध्या वाजंत्री हिने सहभाग घेतला. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला.
जलतरणासारख्या कौशल्य, वेग आणि सातत्याची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही विविध क्रीडा प्रकारांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता असून योग्य मार्गदर्शन व सरावाची संधी मिळाल्यास ते जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे वेदांत आणि आराध्याच्या यशातून अधोरेखित झाले आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय पेंडूरकर, किसन हडलगेकर, भूषण गावडे तसेच जलतरण प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्थाचालक, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेदांत पोफळे आणि आराध्या वाजंत्री यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






