सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन समारंभ उत्साहात
मालवण, दि. प्रतिनिधी : आजचे तरुण हे देशाचे मुख्य स्तंभ आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणारे अनुभव, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघभावना यांचा व्यावहारिक जीवनात मोठा उपयोग होतो. त्यामुळे एनएसएस स्वयंसेवकांनी समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी केले.
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन समारंभ उत्साहात झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, तर अध्यक्षस्थानी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस लक्ष्यगीताने झाली. एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी उद्बोधन सत्रात चालू शैक्षणिक वर्षातील एनएसएस विभागाच्या नियोजित उपक्रम व प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने यावर्षी हाती घेतलेल्या डिजिटल साक्षरता, मानसिक आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण या प्रकल्पांचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांनी एनएसएस स्वयंसेवकांनी स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देऊन कार्य करावे, असे आवाहन केले. कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे भवितव्य घडविताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांचा उपयोग करून घ्यावा, असे सांगितले.
दरम्यान, एनएसएस विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित लेखन प्रेरणा दिवस, स्वच्छता पंधरवडा आणि नशामुक्त युवा अभियान यांच्या अनुषंगाने १० ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मयुरी अविनाश परब हिने प्रथम, अंबाजी वलकर व पूर्वा परब यांनी द्वितीय, तर रिद्धी केळुसकर व दीक्षा परुळेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच शैक्षणिक वर्षासाठी एनएसएस विभागातील विद्यार्थी नेते म्हणून निवड झालेल्या गौतम मानवर, रिद्धी काजरेकर, हर्षद पाटकर आणि अपूर्वा पालव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. संकेत बेळेकर यांनी केले, तर प्रा. योगिता सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास एनएसएस स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इकोमेट्स संस्थेच्या मनिषा पारकर उपस्थित होत्या.






