मुंबई, दि. ३१ ऑगस्ट : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसह बालनाट्य आणि दिव्यांग बाल नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी माहिती दिली.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्य नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांबरोबरच बालनाट्य आणि दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचाही यामध्ये समावेश आहे.
२३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १ डिसेंबर २०२६ पासून विविध १० केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ६५ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येक एका केंद्रावर १ डिसेंबर २०२६ पासून आयोजित केली जाणार आहे.
नाट्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना विहित नमुन्यातील प्रवेशिका आणि नियमावली सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशिका ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच प्रवेशिकेसोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसतील किंवा संपूर्ण तपशील भरलेला नसेल, तर ऑनलाइन प्रवेशिका भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर आणि दिलेल्या तारखेस प्रयोग सादर करणे बंधनकारक राहणार आहे. प्रयोग सादर न केल्यास संस्थेची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल आणि नाट्यस्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.
दरम्यान, राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.







