१५ लाखांच्या निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर; १८ विद्युत पोलची उभारणी
मालवण, दि. ३१ (प्रतिनिधी) : देऊळवाडा ते सातेरी मंदिर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार वीजखंडित होण्याची समस्या आता दूर होण्याच्या मार्गावर आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १५ लाख रुपयांच्या नियोजन निधीतून नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला असून, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या कामासाठी मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर होण्यास मदत होणार असून, कमी दाबाची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच वादळी पावसाच्या काळात वारंवार होणारे वीजखंडितही कमी होण्याची शक्यता आहे. या कामांतर्गत सुमारे १८ नवीन विद्युत पोल उभारण्यात आले आहेत.
या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका भाग्यश्री मयेकर-लुडबे, नगरसेविका नीना मुंबरकर, बाबा लुडबे, समीर वर्दम, अर्जुन चव्हाण, मोहन आचरेकर, पराग चव्हाण, जितेंद्र मराळ, विश्वास परब, रुपाली आचरेकर, प्रमिला मराळ, जागृती मराळ, दीप्ती मराळ, अश्विनी मराळ, शीतल कदम, विजय तळगावकर, प्रमिला चव्हाण, संतोष मराळ, उदय वीर, बंटी आचरेकर, प्रमोद मराळ, सूर्यकांत फणसेकर, अशोक मराळ, शशी यादव, ओंकार यादव, गायत्री मराळ, गजानन मराळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी समीर वर्दम, अर्जुन चव्हाण आणि शुभांगी मराळ यांनी या कामासाठी झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील नागरिकांना सुरळीत आणि स्थिर वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.







