सिंधुदुर्ग : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्गच्या नाट्यशाखा समितीवर मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. रविवार, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा बैठकीत कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष, नाटककार प्रदीप ढवळ यांनी नाट्यशाखा समितीची घोषणा केली.
या समितीवर कणकवलीचे अभय खडपकर, कुडाळच्या वर्षा वैद्य, मालवणचे संजय शिंदे आणि सावंतवाडीचे अभिनेते-दिग्दर्शक बाळ पुराणिक यांची निवड करण्यात आली.
सुमारे १७५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या संगीत नाट्यकलेचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य बाळ पुराणिक सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या योगदानाचे कौतुक करताना कोमसापच्या माध्यमातून त्यांच्या नाट्यविषयक कार्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही प्रदीप ढवळ यांनी दिली. तसेच त्यांनी बाळ पुराणिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या बैठकीला कोमसापचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा कार्यवाह ॲड. संतोष सावंत, कवी रुजारिओ पिंटो, अभिमन्यू लोंढे, संदीप वालावलकर, वैद्य सर, वर्षा वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
बाळ पुराणिक यांच्या निवडीमुळे सिंधुदुर्गातील पारंपरिक संगीत नाट्यकलेला संस्थात्मक पाठबळ मिळण्यासह नव्या पिढीपर्यंत ही कला पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






