मालवण, दि. : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि राणे कुटुंबीयांच्या ज्येष्ठ सहकारी सौ. सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सरोजताईंना श्रद्धांजली अर्पण केली.
सरोज परब यांनी १९९० पासून राणे साहेबांसोबत निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम केले. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत राहून त्यांनी आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली. राणे साहेबांच्या राजकीय प्रवासात त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या सहवासातील आठवणी कायम स्मरणात राहतील, अशी भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली.
“सरोजताईंच्या निधनाने एक निष्ठावंत आणि ज्येष्ठ सहकारी गमावल्याची भावना मनात आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे,” असेही निलेश राणे यांनी म्हटले.
सरोज परब यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करताना त्यांच्या साधेपणाचा, निष्ठेचा आणि समर्पित वृत्तीचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. त्यांच्या आकस्मिक निधनाने राणे समर्थक तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुःखद प्रसंगी आपण सरोज परब यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना आमदार निलेश राणे यांनी केली.







