मालवण, दि. ३० : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, माजी शिक्षिका आणि ज्येष्ठ राजकीय-सामाजिक कार्यकर्त्या सौ. सरोज शिवाजी परब (मसुरे-मर्डेवाडी) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. खासदार नारायण राणे यांच्या निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले. चारवेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झालेल्या सरोज परब यांच्या निधनाने मसुरे दशक्रोशीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सरोज परब यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे येथे झाले. डी.एड.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षिका म्हणून सेवा बजावली. त्यानंतर मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. मात्र, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची असलेली ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
१९८० च्या सुमारास मसुरे येथील शिवाजी परब यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिवाजी परब आणि सरोज परब या दाम्पत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी नाते जोडत मसुरे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी काम सुरू केले. १९९० मध्ये नारायण राणे मालवण-कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर परब दाम्पत्य त्यांच्याशी संपर्कात आले. पुढे सरोज परब या राणे यांच्या विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून सक्रिय राहिल्या.
१९९२ मध्ये तत्कालीन आमदार नारायण राणे यांनी सरोज परब यांना मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत त्यांनी जिल्हा परिषदेत प्रवेश केला. त्यानंतर मसुरे दशक्रोशीतील विविध विकासकामांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या धडाडीच्या कार्याची दखल घेत १९९७ मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या. या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापतीपदाची जबाबदारीही प्रभावीपणे सांभाळली.
२००२ मध्ये त्यांनी मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि पुन्हा विजय मिळवत हॅट्ट्रिक साधली. याच कालखंडात त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांना प्राधान्य देत धडाडीने निर्णय घेतले.
राजकीय प्रवासात काही काळ खंड पडला असला तरी सामाजिक कार्याशी त्यांची नाळ कायम राहिली. २०१७ मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी पुन्हा मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवत चौथ्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान मिळविला. चारवेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत त्यांनी सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
धडाडी, निर्णयक्षमता, संघटनकौशल्य आणि विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. ग्रामीण भागातून पुढे येत जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या सरोज परब यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महिला नेतृत्वासाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
सौ. सरोज परब यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहिणी, दीर, भावजय, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मालवण नगरपालिकेच्या शिवसेना नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मसुरेचे माजी उपसरपंच राहुल परब यांच्या त्या मातोश्री होत. तसेच सेवानिवृत्त एस.टी. वाहतूक नियंत्रक व समाजसेवक शिवाजी परब यांच्या त्या पत्नी होत.
दरम्यान, सौ. सरोज परब यांच्या पार्थिवावर रविवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता मसुरे-मर्डेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक कर्तृत्ववान महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.







