मालवण, दि. : प्रतिनिधी
मालवण शहरातील स्वच्छ, सुंदर आणि चंदेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या चिवला बीचवर गेल्या दहा दिवसांपासून धोकादायक स्थितीत पडलेला विद्युत पोल आणि सुरू असलेली विद्युत केबल अखेर महावितरणकडून हटविण्यात आली. त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल उभारून वीजपुरवठ्याची धोकादायक परिस्थिती दूर करण्यात आली आहे. शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत महावितरण अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली.
चिवला बीच परिसरात पारंपरिक मच्छीमार, रापण पातधारकांची मोठी लोकवस्ती आहे. तसेच दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. त्यामुळे परिसरात स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून विद्युत पोल आणि केबल धोकादायक अवस्थेत पडून होती.
काही दिवसांपूर्वी माडाचे झाड कोसळल्याने विद्युत पोल आणि केबल तुटून थेट जमिनीवर पडली होती. त्यातच समुद्राच्या भरतीचे पाणी या पोल आणि विद्युत केबलपर्यंत पोहोचत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. समुद्रात जाणारे मच्छीमार, स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्याकडे धाव घेतली. जोगी यांनी तातडीने महावितरणच्या शहर कार्यालयात जाऊन शहर अभियंता श्री. मयेकर यांची भेट घेतली. “जमिनीवर पडलेली चालू विद्युत केबल तातडीने हटवून नवीन पोल उभारावा. महावितरण एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच काम तातडीने न झाल्यास मच्छीमारांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणचे कर्मचारी तत्काळ चिवला बीचवर दाखल झाले. त्यांनी धोकादायक अवस्थेत पडलेला पोल आणि विद्युत केबल हटवून त्या ठिकाणी नवीन पोल उभारण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून निर्माण झालेला संभाव्य जीवघेणा धोका दूर झाला आहे.
या प्रश्नाची तातडीने दखल घेत प्रशासनाकडून काम करून घेतल्याबद्दल चिवला बीच परिसरातील मच्छीमार, पातधारक आणि नागरिकांनी बाबी जोगी यांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे.







