मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात जिमखाना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलींमध्ये टी.वाय.बी.ए.ची भूमी मसुरकर हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर कनिष्ठ महाविद्यालयाची मानसी धुरत हिने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात कनिष्ठ महाविद्यालयाचा भावेश परब प्रथम, तर टी.वाय.बी.कॉम.चा श्रीराज परब द्वितीय ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते आणि जिमखाना प्रमुख प्रा. हंबीरराव चौगले यांनी स्वतः नारळ लढवून केले. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनीही या पारंपरिक खेळाचा आनंद घेत सहभाग नोंदविला. स्पर्धेत महाविद्यालयातील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कोकणातील पारंपरिक खेळ आणि लोकसंस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांचा प्राचार्य कैलास राबते, प्रा. उज्वला सामंत आणि प्रा. संग्रामसिंह पवार यांच्या हस्ते चषक देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे नियोजन प्रा. रोहिणी फाटक, प्रा. मंदार मुंडले, मनिष डिकवलकर, प्रणव शिंदे, नारायण सावंत, जगदीश कीर, वेदांत कुपकर, अथर्व कुपकर, हर्ष कदम, साक्षी परब आणि सानिया चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाला सांस्कृतिक प्रमुख डॉ. उज्वला सामंत, आयक्यूएसी प्रमुख प्रा. संग्रामसिंह पवार, डॉ. डी. व्ही. हारगिले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. सौ. सावंत, प्रा. अनघा टिकले, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. मिलन सामंत, प्रा. हसन खान, प्रा. सुदेशना सारंग आदी उपस्थित होते.
विद्यार्थी ओम तोडणकर यांनी स्पर्धेसाठी चषक उपलब्ध करून दिला. संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे आणि कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ. हंबीरराव चौगले यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मंदार मुंडले यांनी केले.
पारंपरिक खेळाला आधुनिक शैक्षणिक वातावरणात व्यासपीठ देत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, स्पर्धात्मकता आणि कोकणी संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.







