देवबाग हायस्कूलचा अभिनव ‘वृक्षबंधन’ उपक्रम
मालवण (प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या सणाला पर्यावरण संवर्धनाची अनोखी जोड देत डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नारळाच्या झाडाला राखी बांधून निसर्गरक्षणाचा संदेश दिला. ‘अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई’ संचालित या प्रशालेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘वृक्षबंधन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिक्षिका सौ. मेस्त्री (पाटणे) यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक नसून, मानवाने निसर्गाचे आणि वृक्षांचेही संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हा व्यापक संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
शाळेजवळील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नारळाच्या झाडाला विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून स्वतः तयार केलेली मोठी, आकर्षक आणि सुंदर राखी बांधली. विशेष म्हणजे ही राखी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून तयार करण्यात आली होती. झाडाला राखी बांधताना विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक जवळून अनुभवता आले. वृक्ष आपल्याला प्राणवायू, सावली, फळे तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यामुळे वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आली.
या अभिनव उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाळेचे व्यवस्थापन तसेच अखिल देवबाग विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारे असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘वृक्षबंधन’ उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मेस्त्री, सौ. गोसावी, कु. मांजरेकर आणि श्री. गजानन मांजरेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षाशी नाते जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला.







