मालवण (प्रतिनिधी) : चिंदर गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची समस्या आणि वाढता वीजभार यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून चिंदर गावातील तीन ठिकाणी नवीन १०० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. या कामाबद्दल पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांनी संबंधित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
चिंदर गावातील लब्देवाडी आणि कुंभारवाडी येथे सध्या कार्यरत असलेले ६३ केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी नवीन १०० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. तसेच गावठणवाडी येथेही नवीन १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे.
गावात वाढत्या लोकसंख्येसोबतच वीज उपकरणांचा वापर आणि वीजभार वाढत असल्याने विद्यमान यंत्रणेवर ताण येत होता. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे आणि त्यातून घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर या समस्यांमध्ये मोठी सुधारणा होऊन चिंदरमधील वीजपुरवठा अधिक सुरळीत आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भटवाडी येथे खास यात्रेच्या पार्श्वभूमीवर १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून त्याची पूर्तताही करण्यात आली आहे. त्यामुळे चिंदर गावातील विविध भागांमधील वीज वितरण व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे.
या कामांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे चिंदर ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. चिंदर गावातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातील वीजविषयक अडचणी कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सुर्वे यांनी सांगितले.







