मालवण (प्रतिनिधी) : आचरा पिरावाडी येथील श्री हनुमान मंदिरात भक्तिमय वातावरणात हनुमान चालीसा सामूहिक वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि श्री हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरेला भक्तीची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला हनुमान भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आतापर्यंत झालेल्या तीन श्रावणी शनिवारांमध्ये एकूण २ हजार ८३५ दिवे भक्तांच्या क्लेशपरिहारार्थ श्री हनुमान चरणी प्रज्वलित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर श्री रामरक्षा पठण, सामूहिक हनुमान चालीसा वाचन, हनुमान स्तोत्र आणि मंत्रपठण करण्यात आले. धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात श्री हनुमानाची महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिकरित्या हनुमान चालीसाचे पठण करून श्रींच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.
यानंतर आचरा पिरावाडी परिसरातून श्री हनुमानाची पालखी परिक्रमा काढण्यात आली. पालखी सोहळ्यातही मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. जय हनुमानाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
श्रावण महिन्यातील सलग धार्मिक उपक्रमांमुळे आचरा पिरावाडी परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. सामूहिक पठण, दीपप्रज्वलन आणि पालखी परिक्रमेच्या माध्यमातून भाविकांना एकत्र आणण्याचा तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने हनुमान भक्त उपस्थित होते. श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि श्री हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य तसेच सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि पालखी परिक्रमा भक्तिमय वातावरणात पार पडली.







