सिंधुदुर्ग, दि. २५ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ ही यंदाची संकल्पना असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित उपक्रम दि. २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी दिली.
शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटना, क्रीडा अकॅडमी, युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. युवा पिढीला तंदुरुस्त बनविणे तसेच ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
दि. २८ ऑगस्ट रोजी ‘Digital Tributes’, ‘२९ Challenge’, ‘Pass the Ball’ आणि ‘Sports Bandhan’, २९ ऑगस्ट रोजी ‘एक घंटा खेल के मैदान में’, तर ३० ऑगस्ट रोजी ‘Sundays on Cycle’ आणि ‘Run and Ride’ हे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने २९ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, सिंधुदुर्ग येथे होणार आहे. ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारांत ८, १०, १२, १४ आणि १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
३० ऑगस्टला सायकल रॅली
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सायकलिस्ट असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Sundays on Cycle’ सायकल रॅली ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ५.१५ वाजता एकत्र येण्याची वेळ असून, ५.३० वाजता फ्लॅग ऑफ करण्यात येईल.
रॅलीची सुरुवात इन्स्पायर सायकल्स, कुडाळ येथून होऊन एस. एन. देसाई चौक, पिंगुळी तिठा, पाट रोड, पाट तिठा मार्गे पाट तलाव येथे पोहोचेल. तेथून यू-टर्न घेऊन पुन्हा इन्स्पायर सायकल्स येथे रॅलीचा समारोप होईल. सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतराच्या या रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी हेल्मेट तसेच सायकलला पुढील व मागील लाईट्स असणे बंधनकारक आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित जलतरण स्पर्धा, सायकल रॅली आणि अन्य उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.






