अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा; ३० युवा-युवतींचा सहभाग
कुडाळ (प्रतिनिधी) : युवकांना विविध सामाजिक प्रश्नांबाबत सजग करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये वैचारिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘वक्तृत्व स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली. सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय विषयांवर युवकांनी आपली मते प्रभावीपणे मांडत या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेच्या विचारमंचावर साहित्यिका सरिता पवार, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक सहदेव पाटकर, पर्यावरण अभ्यासिका मेगल डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुढील महिन्यापासून ‘वाचन संस्कृती विकास’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. दर महिन्याला एका रविवारी हा उपक्रम आयोजित केला जाणार असून युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री यांनी जिल्ह्याची पर्यावरणीय समृद्धी आणि जैवविविधता अबाधित राखण्याच्या दृष्टीने आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपक्रमात युवा वर्गाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘कोकण का तापतंय?’, ‘महिला अत्याचार – दोष कुणाचा?’, ‘युवकांचे भविष्य – सकारात्मक बदलाची गरज’ आणि ‘आजचे राजकारण आणि युवकांची भूमिका’ हे चार विषय देण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध भागांतून एकूण ३० युवा-युवतींनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेत इन्सुली येथील विठ्ठल संजय दळवी (वय २५) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हरकुळ बुद्रुक येथील प्रतीक्षा संजय पाटील (वय १८) यांनी द्वितीय, तर न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथील अस्मि धनंजय करंगुटकर (वय १६) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. शा. कृ. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथील आर्या सत्यवान जोईल (वय १८) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या पारितोषिकांचे प्रायोजकत्व अनुक्रमे सचिन कोरगावकर, गोपुरी आश्रम आणि ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यांनी स्वीकारले.
यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे अमित कदम, तसेच साथी मेगल डिसोझा, तन्मय पंडित, राहुल जाधव आणि रोहित जाधव या युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक सहदेव पाटकर यांच्यासह यज्ञेश पोकळे, सुदीप दिगवळेकर, राहुल कांबळे, श्रुती पाटणकर, बुशरा बागवान, सिद्धी परब, महेश जाधव, सिद्धेश बाईत, वनश्री जाधव आणि दुर्गेश पवार यांनी विशेष मेहनत घेतली.







