मालवण (प्रतिनिधी) : हिवाळे रस्त्यावर डंपर आणि दुचाकीची झालेल्या अपघातात राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री आणि त्यांचा मुलगा भास्कर मेस्त्री गंभीर जखमी झाले होते. भास्कर मेस्त्री यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू असून, या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राठिवडे येथे मेस्त्री कुटुंबीयांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.
वैभव नाईक यांनी सत्यवान मेस्त्री यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. अपघातामुळे कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांना धीर देत उपचारासाठी आर्थिक मदतही केली. तसेच भास्कर मेस्त्री यांच्या सुरू असलेल्या उपचारांबाबत माहिती घेत कुटुंबीयांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या दोन महिन्यांपासून भास्कर मेस्त्री यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने कुटुंबावर आर्थिक भार पडला आहे. अशा परिस्थितीत वैभव नाईक यांनी प्रत्यक्ष घरी भेट देत मदतीचा हात दिल्याने मेस्त्री कुटुंबीयांना आधार मिळाला.
यावेळी शिवसेना आडवली-मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, युवासेना विभागप्रमुख युवराज मेस्त्री, प्रवीण सावंत, सुभाष धुरी, पोईप विभागप्रमुख विजय पालव, सचिन कुमामेकर, देवेंद्र पुजारे आदी उपस्थित होते.






