प्रलंबित दिवाणी-फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची संधी
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय, कणकवली येथे शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये कणकवली येथील दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दिवाणी तसेच फौजदारी स्वरूपाची न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी पक्षकारांना मिळणार आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था तसेच ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणेही परस्पर संमतीने मिटविता येणार आहेत.
ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढायची आहेत, त्यांनी संबंधित प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, कणकवली यांच्याकडे दाखल करावीत. तसेच वादपूर्व चर्चेद्वारे प्रकरण मिटविण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी निर्धारित दिवशी न्यायालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकअदालत ही न्यायालयीन वाद तडजोडीने आणि परस्पर संमतीने निकाली काढण्याची प्रभावी व्यवस्था असून, त्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होते. प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कणकवली आणि अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, कणकवली श्री. एस. जी. लटुरिया यांनी केले आहे.







