सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (प्रतिनिधी) :
कोकणातील सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतात. गणेशोत्सव तसेच अनंत चतुर्दशीच्या काळात नागरिकांचा प्रवास आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी देखभाल-दुरुस्तीची कामे ५ सप्टेंबरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामे, रस्ते, वीज, दूरसंचार तसेच नागरिकांच्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. प्राप्त झालेला निधी संबंधित विभागांकडे वेळेत वर्ग करावा. स्थानिक प्रशासन आणि कंत्राटदारांना विश्वासात घेऊन कामांचा दर्जा उत्तम राखावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वीज आणि दूरसंचार यंत्रणेला सतर्कतेचे आदेश
गणेशोत्सव काळात वीज आणि दूरसंचार यंत्रणेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित विभागांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. महावितरणने अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करावी. तसेच बीएसएनएलने नेटवर्कमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवा
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात येणार असल्याने मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. उपलब्ध निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करण्यावरही पालकमंत्र्यांनी भर दिला.
सर्व विभागांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कामे पूर्ण करावीत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.
पुढील गुरुवारी पुन्हा आढावा
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी ग्रामीण तसेच शहरी भागातील विविध स्थानिक समस्या प्रशासनासमोर मांडल्या. या समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, विविध कामांच्या प्रत्यक्ष प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पुढील गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने वेग वाढवावा, असे निर्देश त्यांनी दिले.







