रॉक गार्डन येथे वृक्षारोपण; ‘पाणी वाचवा, वृक्ष जगवा’चा संदेश
मालवण (प्रतिनिधी) :
जलसंधारणाचे महत्त्व, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मालवण नगरपरिषदेतर्फे जलसंधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रॉक गार्डन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही असलेले नागरिक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रॉक गार्डन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जलसंधारणाबरोबरच वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
पाण्याचा वाढता वापर आणि बदलते पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेता पाण्याची बचत करणे, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे तसेच अधिकाधिक वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
‘पाणी वाचवा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश देत उपस्थितांनी जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला. जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबतची जबाबदारी आणि जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.






