आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थी होणार एकरूप; रोबोटिक्स, एआय, कोडिंगसह IoTचे मिळणार प्रात्यक्षिक ज्ञान
मालवण (प्रतिनिधी) :
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे आणि त्यांच्यात विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स तसेच नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे ईआय-टिंकर लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव घन:श्याम राणे, ईआय-टिंकर लॅबचे डायरेक्टर अभिजीत सहस्रबुद्धे, कृष्णमूर्ती, प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश तावडे, माजी मुख्याध्यापक सुरेश परब, कुणकवळे केंद्राचे केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख गौरव नाईक, संस्थेचे पदाधिकारी अतीक शेख, सुभाष सावंत, प्रदीप सावंत, ग्रामपंचायत खरारे-पेंडूरच्या प्रभारी सरपंच सौ. परब, ग्रामसेविका सौ. सापळे, पालक संघाचे उपाध्यक्ष संजय वारिक यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईआय-टिंकर लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधांची माहिती घेतली. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
पारंपरिक पद्धतीने केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिकण्याची संधी या लॅबच्या माध्यमातून मिळणार आहे. विविध तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळणार असून समस्या सोडविण्याची क्षमता, तार्किक विचार, संशोधन वृत्ती आणि नवसर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळणार आहे.
भविष्यातील तंत्रज्ञानाच्या युगासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. ‘प्रयोगातून शिक्षण, तंत्रज्ञानातून नवसर्जन आणि नवसर्जनातून उज्ज्वल भविष्य’ या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ईआय-टिंकर लॅब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.







