डॉ. रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन; भावनिक बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्यावर कट्टा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मालवण (प्रतिनिधी) :
“प्रत्येक मागणीला होकार देण्याऐवजी योग्य वेळी ‘नाही’ स्वीकारण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अपयश, निराशा आणि अडचणींना सामोरे जाण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांमध्ये असणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील मानसोपचार तज्ज्ञ, लेखक व समुपदेशक डॉ. रुपेश पाटकर यांनी केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्याबाबत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक महेश भाट, सहाय्यक शिक्षक एकनाथ राऊळ, बाळकृष्ण वाजंत्री आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक शिक्षक एकनाथ राऊळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पर्यवेक्षक महेश भाट यांच्या हस्ते डॉ. रुपेश पाटकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे विचार निर्माण होण्यामागील विविध कारणांवर डॉ. पाटकर यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. अशा टोकाच्या परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने संवाद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासाचे आणि मनमोकळेपणाने व्यक्त होता येईल, असे वातावरण मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या मनातील भावना समजून घेणे आणि त्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. पाटकर यांनी स्पष्ट केले.
कुमारवयात निर्माण होणारे आकर्षण, मैत्री, प्रेम आणि भावनिक अवलंबित्व यातील फरक विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भावनेच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय न घेता आपल्या भावनांना ओळखणे, त्या समजून घेणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करून हाताळणे ही भावनिक बुद्धिमत्तेची महत्त्वाची कौशल्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपयश आले किंवा अपेक्षेप्रमाणे गोष्ट घडली नाही, तर निराश होण्याऐवजी परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी विकसित करावी. ‘नाही’ हा शब्द ऐकण्याची आणि स्वीकारण्याची मानसिकता हीदेखील व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा भाग आहे, असे डॉ. पाटकर यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या मनातील भावना, ताणतणाव आणि अडचणी समजून घेण्याची जबाबदारी शिक्षकांचीही असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी संवाद, समुपदेशन आणि आधार मिळाल्यास अनेक गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक बाळकृष्ण वाजंत्री यांनी आभार मानले.






