मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान असलेला गणेशोत्सव यंदा अधिक व्यापक स्वरूपात ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालये, आस्थापना आणि महामंडळांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.
गणेशोत्सवाचा गावापासून शहरापर्यंत व्यापक सहभाग वाढविण्यासोबतच या उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
४८० उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिके
राज्यातील ४८० उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सुमारे दीड कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. तालुका व जिल्हास्तरीय द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत समारंभ आयोजित केले जाणार आहेत.
देश-विदेशात गणेशोत्सवाचा सांस्कृतिक जागर
गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांसह महाराष्ट्राबाहेरील १० राज्ये आणि भारताबाहेरील एका देशात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नवी दिल्ली येथे पाच दिवस, तर मुंबईत आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्थानिक संस्थांच्या सहकार्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
प्रमुख गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. तसेच घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. गणेशोत्सवाचा इतिहास, परंपरा, अष्टविनायक, पर्यावरणपूरक उत्सव आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून व्यापकपणे प्रसारित केली जाणार आहे.
रील्स स्पर्धा आणि चित्रपटाचा गौरव
दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांच्या माध्यमातून गणपतीविषयक रील्स स्पर्धा विभागीय आणि राज्यस्तरावर आयोजित केली जाणार आहे. गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा आणि प्रथांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या मराठी चित्रपटाचाही गौरव करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर
यंदाच्या राज्य महोत्सवात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. शाडू मातीच्या मूर्ती, बीज गणपती, निर्माल्य संकलन व पुनर्वापर, प्लास्टिकमुक्त उत्सव, एलईडी सजावट आणि सौरऊर्जेवरील मंडप याबाबत राज्यभर जनजागृती केली जाणार आहे.
ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण तसेच कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याचे उपक्रम राबविले जातील. जलस्रोतांना बाधा होणार नाही, याची दक्षता घेत जलसंवर्धनाबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
शेतकरी, महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन
स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून दुर्वा, फुले, नैवेद्य साहित्य आणि सेंद्रिय कृषी उत्पादनांची माहिती प्रसारित केली जाणार आहे. महिला बचतगट आणि सहकारी संस्थांना मोदक, प्रसाद साहित्य आणि स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
गणेशमूर्ती, मखर, सजावट आणि पूजासाहित्य तयार करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह स्थानिक कारागिरांसाठीही प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जाणार आहेत.
युवकांसाठी शाडूच्या मूर्ती, मखर, सजावट आणि डिजिटल डिझाइनवर आधारित उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. शाळांमध्ये शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याच्या कार्यशाळा, निबंध, वक्तृत्व आणि सांस्कृतिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. महाविद्यालयांमध्ये ‘गणेश आणि विज्ञान’ या विषयावर परिसंवाद, व्याख्याने आणि नवोपक्रम प्रदर्शनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
आरोग्य आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य
गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि हृदयविकाराच्या प्रसंगी प्रथमोपचारासाठी सीपीआर प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. वैद्यकीय मदत केंद्रे, स्वयंसेवक, अन्नसुरक्षा तपासणी आणि भेसळ प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
दिव्यांग भाविकांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सांकेतिक भाषेतील आरती, स्पर्शदर्शन आणि सुलभ प्रवेश यांसारख्या सुविधांवरही भर देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका आणि जिल्हास्तरीय समित्या गठित करून प्रत्यक्ष भेटीद्वारे अर्जांची तपासणी, गुणांकन आणि अंतिम निकालाची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई, विसर्जन मिरवणुकांचे संयोजन, स्थानिक कार्यक्रमांचे नियंत्रण आणि प्रसिद्धीची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. गृह विभागाने उत्सवाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन करावे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने विसर्जन मार्ग, दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि सुरक्षित पादचारी सुविधांची दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
विविध स्पर्धांच्या समन्वयाची जबाबदारी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र राज्य कला अकादमीच्या संचालकांकडे, तर मंत्रालयीन विभाग आणि कार्यालयांमार्फत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समन्वयासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चे स्वरूप देत परंपरा, संस्कृती, पर्यावरण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा व्यापक प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.







