मालवण (प्रतिनिधी) : भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे प्रभावी आणि सुरेल सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. समूहगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या संघांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यातील देशभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.






