कणकवली, ता. १६ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली ओसरगाव येथील टोल नाका उद्या, १७ ऑगस्टपासून सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मात्र, सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत महामार्ग विभागाकडून अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
१७ ऑगस्टपासून टोलवसुली
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली-ओसरगाव येथील टोल नाका उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांचे लक्ष आता टोलमाफीच्या निर्णयाकडे लागले आहे.
६० किलोमीटरच्या मार्गासाठी टोल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पडवे या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल केला जाणार आहे. सिंधुदुर्गवासीयांसाठी संपूर्ण टोलमाफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलवसुलीचे जाहीर केले आहे.
ओसरगाव टोल नाक्यावरील वसुलीचे कंत्राट स्कायवॉक इन्फ्रा इंजिनिअर्स यामधील कंपनीला देण्यात आले आहे. यापूर्वी टोल नाका सुरू करण्याचे तीन वेळा आदेश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील आक्रमक भूमिका आणि विरोधामुळे टोलवसुली सुरू होऊ शकली नव्हती. आता १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता टोल सुरू होणार असल्याने पुढील घडामोडींना वेग आला आहे.
व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत
ओसरगाव टोल नाक्यावर १७ जूनपासून टोलवसुली सुरू केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर खासगी अव्यावसायिक वाहनांसाठी महिन्याला ३३० रुपयांचा पास उपलब्ध असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे टोल सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गकरांना टोलमाफी मिळणार की वाहनधारकांना टोल भरावा लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







