सिंधुदुर्ग : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील ओसरगाव टोल प्लाझावर उद्या, 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून टोलवसुली सुरू होणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
ओसरगाव टोल प्लाझा हा NH-66 वरील जणवली ते पत्रादेवी या कि.मी. 395.000 ते कि.मी. 460.410 या मार्गिकेशी संबंधित आहे.
कोणत्या वाहनाला किती टोल?
जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार कार, जीप, व्हॅन किंवा हलकी मोटार वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा टोल 125 रुपये, तर त्याच दिवशी परतीच्या प्रवासासाठी 190 रुपये आकारले जाणार आहेत. या वाहनांसाठी 50 एकेरी प्रवासांचा मासिक पास 4,170 रुपये असेल.
हलकी व्यावसायिक वाहने आणि मिनी बस यांच्यासाठी एकेरी प्रवासाचा दर 200 रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी 305 रुपये आहे. मासिक पासची किंमत 6,740 रुपये आहे.
दोन-अॅक्सल वाहन, मिनी बस, ट्रक किंवा बस यांच्यासाठी एकेरी प्रवासाचा टोल 425 रुपये, तर परतीचा प्रवास 635 रुपये असेल. मासिक पाससाठी 14,120 रुपये आकारले जाणार आहेत.
तीन-अॅक्सल व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी प्रवास 460 रुपये, परतीचा प्रवास 695 रुपये, तर मासिक पास 15,405 रुपये आहे.
4 ते 6 अॅक्सलची मल्टी-अॅक्सल वाहने, अवजड बांधकाम यंत्रसामग्री किंवा अर्थमूव्हिंग मशिनरीसाठी एकेरी प्रवासाचा टोल 665 रुपये, परतीचा 995 रुपये, तर मासिक पास 22,145 रुपये असेल.
तर 7 किंवा त्यापेक्षा अधिक अॅक्सलच्या मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा टोल 810 रुपये, परतीचा 1,215 रुपये आणि मासिक पास 26,960 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनांना 50 टक्के दर
ओसरगाव टोल प्लाझाच्या हद्दीत जिल्ह्यात नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी प्रवासाच्या शुल्कावर 50 टक्के दराची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित वाहनांसाठी अनुक्रमे 65, 100, 210, 230, 330 आणि 405 रुपये असे दर लागू होणार आहेत.
स्थानिक अवाणिज्यिक प्रकल्पाच्या वाहनांसाठी मासिक पास शुल्क 350 रुपये आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, ओसरगाव टोलनाक्यावर व्यावसायिक वाहनांना 50 टक्के सवलतीचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला होता.
महत्त्वाचे : ओसरगाव टोलवसुलीची सुरुवात — 17 ऑगस्ट 2026, सकाळी 8 वाजता.






