मालवण (प्रतिनिधी) : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी आज सकाळी मालवण शहराचा परिसर दणाणून गेला. भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि मालवण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेच्या आवारात ध्वजारोहण झाल्यानंतर शहरातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रभात फेरीतील भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य विशेष आकर्षण ठरले. भरड नाका येथे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर तालबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. लेझीम नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या लेझीम नृत्यासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका राधा दिघे आणि योगिता तारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
प्रभात फेरीत मालवणचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय माने, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन आणि लेझीमच्या तालावर रंगलेले सादरीकरण यामुळे मालवणातील स्वातंत्र्यदिनाची प्रभात फेरी संस्मरणीय ठरली.








