मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्या, विकासकामांचा दर्जा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनातील कथित अनागोंदी कारभाराविरोधात उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी स्वातंत्र्यदिनी मालवण नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मयेकर यांनी उपोषण स्थगित केले.
मयेकर यांनी सकाळी ९ वाजता उपोषणाला सुरुवात केली. माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा शिवसेना, मनसे, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी उपोषणाला पाठिंबा दिला.
यावेळी मयेकर यांनी मालवण शहरासाठी मंजूर नळपाणी योजनेचे काम निविदेतील अटी-शर्तींनुसार होत नसल्याचा आरोप केला. योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेच्या जबाबदार व्यक्तीचे ठेकेदाराशी जवळचे नाते असल्याने कामाच्या दर्जावर योग्य नियंत्रण ठेवले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
२० वर्षांपासून भुयारी गटार योजना अपूर्ण असल्याचा मुद्दाही मयेकर यांनी उपस्थित केला. या योजनेचा कालावधी, शासनाकडून मिळालेला निधी, झालेला खर्च आणि योजना अद्याप अपूर्ण का आहे, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. ठेकेदारासोबत आढावा बैठक घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
मालवणच्या प्रवेशद्वारावरील देऊळवाडा ते भरड या मुख्य रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामे आणि स्टॉलमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करण्यात आला. ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी मयेकर यांनी केली. यासंदर्भात काही पक्ष पदाधिकाऱ्यांकडून हप्ते वसुली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शहरातील घरोघरी कचरा संकलनासाठी यंदा सुमारे २ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आल्याचा मुद्दा मंदार ओरसकर यांनी उपस्थित केला. एवढा खर्च करूनही पूर्वीप्रमाणेच कचरा संकलन होत असल्याचा आरोप करत निविदेतील अटींचे पालन न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
उपोषणस्थळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी भेट देऊन मयेकर व उपस्थितांशी चर्चा केली. नळपाणी आणि भुयारी गटार योजनेबाबत एका महिन्याच्या आत आढावा बैठका घेण्यात येतील, असे लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच देऊळवाडा-भरड रस्त्यालगतची अतिक्रमणे गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांच्या सहकार्याने हटविण्याच्या कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
घरोघरी कचरा संकलनाच्या कामाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने ठेकेदारावर योग्य ती कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचेही लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर मयेकर यांनी उपोषण स्थगित केले. मात्र, आश्वासनानुसार कार्यवाही झाली नाही तर पुन्हा प्रखर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तपस्वी मयेकर यांनी दिला.






