मालवण (प्रतिनिधी) : भारताच्या अखंडतेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ‘अखंड भारत, समर्थ भारत’ या संकल्पनेवर आधारित भव्य टू-व्हीलर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने मालवण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अखंड भारताच्या संकल्पनेबरोबरच देशाच्या सामर्थ्याचा सामूहिक संकल्प नागरिकांमध्ये जागृत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. मालवण एस.टी. बसस्थानक येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर भरड, बाजारपेठ, देऊळवाडा, कुंभारमाठ मार्गे रॅली हुतात्मा स्मारक येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ संघ स्वयंसेवक पुखराज पुरोहित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. रॅलीत सहभागी नागरिकांनी आपल्या दुचाकींवर तिरंगा फडकवत राष्ट्रभक्तीचा जागर केला.
विश्व हिंदू परिषद मालवणचे अध्यक्ष भाऊ सामंत, मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, विविध लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
यावेळी भाऊ सामंत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा संदर्भ देत सामूहिक इच्छाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक दशकांपासूनची ही स्वप्ने जनतेच्या सामूहिक इच्छाशक्तीमुळे साकार झाली असून, त्याच धर्तीवर अखंड भारताचे स्वप्नही प्रभावी जनसहभाग आणि सामूहिक संकल्पातून भविष्यात साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







