मालवण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या काळात मालवण तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत न राहिल्यास महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण यांनी दिला. मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्यातील वीजपुरवठा, भूमिगत वीजवाहिनीचे काम आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
मालवण तालुक्यात सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या कामात खोदाई केलेला भाग बुजविण्यासाठी वाळूऐवजी खडीची क्रशर पावडर वापरली जात असल्याचा आरोप बंडू चव्हाण यांनी केला. काम चुकीच्या पद्धतीने होत असतानाही वीज वितरण विभागाचे त्यावर नियंत्रण नसल्याचे त्यांनी सभेत सांगितले.
तालुक्यातील विविध गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
तोंडवळीतील भूमिगत वीजवाहिनीचे काम तीन वर्षांपासून रखडले
तोंडवळी गावातील वीजपुरवठ्याचा प्रश्न पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांनी उपस्थित केला. मागील तीन सभांमध्ये हा विषय चर्चेला येऊनही अद्याप कार्यवाही झालेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तोंडवळीचे सरपंच आबा कांदळकर यांनी सांगितले की, वनविभागाच्या परवानगीअभावी सुमारे ६३० मीटरच्या भागात गेल्या तीन वर्षांपासून खोदाई झालेली नाही. महावितरणने आवश्यक प्रस्ताव वनविभागाकडे सादर न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तोंडवळीचा समावेश भूमिगत वीजवाहिनीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये असतानाही काम रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही महावितरणकडून अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी आचरा महावितरणच्या अधिकाऱ्यांना एका महिन्याच्या आत वनविभागाकडे प्रस्ताव सादर करून तोंडवळीतील वीजपुरवठ्याचे काम मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
मालवण-बेळणे रस्त्यावरील खड्ड्यांवरही संताप
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गदर्शक फलक बसविण्याचे आश्वासन देऊनही चार बैठका होऊन कार्यवाही न झाल्याने पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावर अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी सायंकाळपर्यंत फलक बसविण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, मालवण-बेळणे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जानेवारीत बुजविण्यात आलेले खड्डे जूनमध्येच पुन्हा उखडल्याचे बंडू चव्हाण यांनी सांगितले. गणेशोत्सव जवळ आल्याने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
शाळांमध्ये शुद्ध पाण्याचा मुद्दा
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळते की नाही, याची पाहणी करण्याची मागणी सदस्य संतोष गावडे यांनी केली. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करून घ्यावी, तसेच शाळांमध्ये शुद्ध पाण्यासाठी एक्वागार्ड मशीन बसविण्याची तरतूद करावी, असा ठराव सभेत घेण्यात आला.
आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती
आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीला गळती लागल्याचा मुद्दा सदस्य दीपक सुर्वे यांनी उपस्थित केला. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीची दुरुस्ती केव्हा होणार, असा सवाल त्यांनी केला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी चार दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
आचरा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचीही दुरवस्था झाली असून गळतीमुळे डॉक्टरांना तेथे बसणेही कठीण झाले आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील घरकुलांची रखडलेली कामे संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणीही संतोष गावडे आणि बंडू चव्हाण यांनी केली. पंचायत समितीसाठी नियुक्त कनिष्ठ अभियंत्यावर कोणताही अतिरिक्त कार्यभार सोपवू नये, असा ठरावही सभेत घेण्यात आला.
सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, मानसी भोगावकर, रिया बावकर, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, दीपक सुर्वे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.






