मालवण (प्रतिनिधी) : शहरातील प्रलंबित विकासकामांवरून उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर हे सत्ताधाऱ्यांवर टीका करत असून उपोषणाचा इशारा देत आहेत. मात्र, नळपाणी योजना, भुयारी गटार योजना आणि भाजी मार्केटसह विविध कामे यापूर्वीच रखडलेली आहेत. त्यामुळे सत्तेत येऊन अवघे आठ महिने झालेल्या आमच्यावर या कामांचे खापर फोडणे योग्य नाही, असा पलटवार मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी केला.
मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, महेश कोयंडे, नगरसेविका नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा वराडकर म्हणाल्या की, तपस्वी मयेकर हे पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, भाजी मार्केट आणि स्वच्छता कर्मचारी वसाहतीची कामे रखडल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. मात्र, ही कामे तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळातील असल्याचा दावा त्यांनी केला.
“वैभव नाईक दहा वर्षे आमदार असताना ही कामे पूर्ण का झाली नाहीत? त्यावेळी तपस्वी मयेकर यांनी आवाज का उठविला नाही?”, असा सवाल वराडकर यांनी उपस्थित केला. तपस्वी मयेकर यांच्या आई तृप्ती मयेकर यादेखील त्यावेळी नगरसेविका होत्या, असे त्यांनी नमूद केले.
नगरपालिका चार वर्षे प्रशासनाच्या ताब्यात असतानाही या योजनांबाबत अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत, आता सत्तेत आल्यानंतर रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वराडकर यांनी सांगितले. व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करून मालवण शहराची नाहक बदनामी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती मिळत असल्याचा दावा करत वराडकर म्हणाल्या की, शहरातील कचरा नियमितपणे उचलला जात असून कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांकडून नगरपालिकेकडे एकही लेखी तक्रार आलेली नाही. यापूर्वी प्रशासनाच्या काळात आणि तत्कालीन आमदारांच्या कार्यकाळात कचरा व्यवस्थापनाची स्थिती काय होती, हे जनतेला माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या आठ महिन्यांत आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराच्या विकासासाठी २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा नगराध्यक्षा वराडकर यांनी केला. या निधीचा योग्य विनियोग करून शहरातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जनतेने विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिले आहे. या विश्वासाचे सार्थक करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू,” असे ममता वराडकर यांनी सांगितले.






