मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विविध मार्गांवर गणपती विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सावंतवाडी रोड, उदना, वडोदरा आणि विश्वामित्री या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबई सेंट्रल–ठोकूर, ठोकूर–मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड, सावंतवाडी रोड–मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी आणि रत्नागिरी–वांद्रे टर्मिनस या साप्ताहिक विशेष गाड्यांचा समावेश आहे. तसेच वडोदरा–रत्नागिरी, रत्नागिरी–वडोदरा, विश्वामित्री–रत्नागिरी, रत्नागिरी–विश्वामित्री, रत्नागिरी–उदना आणि उदना–रत्नागिरी या मार्गांवरही विशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.
कोणत्या मार्गांवर विशेष गाड्या?
मुंबई सेंट्रल–ठोकूर (09013) ही विशेष गाडी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ठोकूर–मुंबई सेंट्रल (09014) ही सेवा ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुटणार आहे.
मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड (09019) ही विशेष गाडी ९ सप्टेंबरपासून आठवड्यात चार दिवस धावणार आहे. तर सावंतवाडी रोड–मुंबई सेंट्रल (09020) ही गाडी १० सप्टेंबरपासून आठवड्यात चार दिवस चालविण्यात येणार आहे.
याशिवाय वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी (09035) ही गाडी १० सप्टेंबर रोजी दुपारी २.२० वाजता सुटेल, तर रत्नागिरी–वांद्रे टर्मिनस (09036) ही सेवा ११ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० वाजता रवाना होईल.
गुजरात-महाराष्ट्र मार्गावरही विशेष सेवा
गणेशोत्सवाच्या काळात गुजरात आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांसाठीही अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. वडोदरा–रत्नागिरी (09114), रत्नागिरी–वडोदरा (09113), विश्वामित्री–रत्नागिरी (09110), रत्नागिरी–विश्वामित्री (09109), विश्वामित्री–रत्नागिरी (09124), रत्नागिरी–विश्वामित्री (09123) आणि उदना–रत्नागिरी (09022) या विशेष गाड्या विविध तारखांना धावणार आहेत.
तसेच रत्नागिरी–उदना (09021), वलसाड–रत्नागिरी (09030) आणि रत्नागिरी–वलसाड (09029) या सेवांचाही विशेष गाड्यांमध्ये समावेश आहे.
१५ ऑगस्टपासून आरक्षण
या विशेष गाड्यांचे आरक्षण १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सर्व PRS आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आगाऊ आरक्षणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना गाडीच्या थांब्यांची आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर तपासण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहता पश्चिम रेल्वेच्या या अतिरिक्त विशेष फेऱ्यांमुळे नियमित गाड्यांवरील प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.






