सिंधुदुर्गनगरी, दि. १४ (जिमाका) : स्वातंत्र्यदिनासह राष्ट्रीय दिन, विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि क्रीडा आयोजनांच्या वेळी लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. मात्र कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज रस्त्यावर, कचऱ्यात किंवा इतरत्र टाकले जात असल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी तसेच त्यानंतरही कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच वापरलेले राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र पडलेले खराब झालेले अथवा फाटलेले राष्ट्रध्वज नागरिकांनी, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था तसेच संबंधित शासकीय समित्यांनी संकलित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज संबंधित शासकीय समित्यांकडे जमा करावेत.
संबंधित शासकीय समित्यांनी नागरिकांकडून जमा झालेले राष्ट्रध्वज स्वीकारून खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदींनुसार लावावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहासोबतच नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






