जलसंधारण सप्ताहात नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जिमाका) : शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथे ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे.
जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने पोलीस परेड ग्राऊंड येथून या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना जास्तीत जास्त ३ किलोमीटर अंतर चालत जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे.
या उपक्रमात १५ वर्षे व त्यावरील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. महा वॉकेथॉनसाठी QR कोड आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाची लोकचळवळ बळकट करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महा वॉकेथॉन आणि जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम व्यापक लोकचळवळ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महा वॉकेथॉनचा मार्ग
सिंधुदुर्गनगरी पोलीस ग्राउंड → डॉन बॉस्को सर्कल → जिल्हा परिषद मुख्य गेट → जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग → सिंधुदुर्गनगरी नर्सिंग कॉलेज → सिंधुदुर्गनगरी पोलीस ग्राउंड
जलसंधारणाच्या या लोकचळवळीत जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.







