मतदार यादीच्या डिजिटायझेशनचे काम पूर्ण; २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-२०२६) मोहिमेत जिल्हा निवडणूक प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या विहित डेटाचे डिजिटायझेशन तसेच ‘अनकलेक्टेड फॉर्म्स’ची कार्यवाही पूर्ण करून १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ६ लाख ८८ हजार १४ मतदारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातील २ लाख ३४ हजार २५१, कुडाळमधील २ लाख १९ हजार २४४ आणि सावंतवाडीमधील २ लाख ३४ हजार ५१९ मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण ६ लाख ५ हजार ४०९ फॉर्म्सचे डिजिटायझेशन करण्यात आले असून, त्याचे प्रमाण ८७.९९ टक्के आहे. उर्वरित फॉर्म्समध्ये अनकलेक्टेड, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. या फॉर्म्सची आवश्यक कार्यवाही पूर्ण करून एकूण १०० टक्के प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
‘अनकलेक्टेबल EF’ मतदारांचीही पडताळणी
ज्या मतदारांचे गणना प्रपत्र स्वाक्षरीसह प्राप्त झालेले नाही, त्यांचा समावेश ‘अनकलेक्टेबल EF’ या संवर्गात करण्यात आला आहे. यामध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचेही डिजिटायझेशन करण्यात आले आहे.
या गटातील कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, यासाठी योग्य पद्धतीने पडताळणी करण्यात येत आहे. ‘अनकलेक्टेबल EF’मधील ASDD गटातील मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी
गणना प्रपत्र भरून घेण्याची कार्यवाही १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर २०२६ आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारांनी यादी तपासण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार यादी १०० टक्के अचूक आणि पारदर्शक बनवणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. योग्य मतदार वगळला जाणार नाही तसेच अयोग्य मतदार मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, यासाठी सर्व नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडील यादी तपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






