डेस्कटॉप युजर्ससाठी महत्त्वाची अपडेट; जुने बॅकअप सुरक्षित, मोबाईल युजर्सवर परिणाम नाही
विंडोज आणि मॅक संगणकावर फोटो आणि व्हिडिओंसाठी गुगल ड्राईव्हचा वापर करणाऱ्या लाखो युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. गुगलने ‘ड्राईव्ह फॉर डेस्कटॉप’ (Drive for Desktop) ॲपद्वारे संगणकावरील फोटो आणि व्हिडिओ आपोआप ‘गुगल फोटो’मध्ये (Google Photos) सिंक करण्याची सुविधा आता बंद केली आहे. या बदलाची पूर्वकल्पना गुगलने युजर्सना जून महिन्यातच दिली होती. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.
या निर्णयामुळे डेस्कटॉपवर साठवलेले फोटो आणि व्हिडिओ यापुढे Drive for Desktopच्या माध्यमातून थेट Google Photosमध्ये आपोआप सिंक होणार नाहीत. त्यामुळे संगणकावरील फोटो-व्हिडिओंचा Google Photosमध्ये बॅकअप घ्यायचा असल्यास युजर्सना उपलब्ध असलेल्या स्वतंत्र बॅकअप पर्यायांचा वापर करावा लागणार आहे.
दरम्यान, या बदलामुळे आधीच Google Photosमध्ये बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट होतील का, अशी चिंता अनेक युजर्समध्ये निर्माण झाली होती. मात्र, गुगलने स्पष्ट केले आहे की पूर्वी बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित राहतील. या निर्णयामुळे जुन्या बॅकअपवर कोणताही परिणाम होणार नाही.
यासोबतच Drive for Desktopच्या माध्यमातून संगणकावरील इतर नेहमीच्या फाइल्सचे सिंकिंग सुरूच राहणार आहे. म्हणजेच दस्तऐवज, फोल्डर्स आणि इतर फाइल्सच्या सिंकिंग सुविधेत बदल करण्यात आलेला नाही.
या निर्णयाचा स्मार्टफोन युजर्सवरही कोणताही परिणाम होणार नाही. Android आणि iOS स्मार्टफोनवर Google Photos ॲपद्वारे होणारा फोटो-व्हिडिओंचा ऑटो-बॅकअप पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
त्यामुळे डेस्कटॉपवर Drive for Desktop वापरून फोटो-व्हिडिओ Google Photosमध्ये आपोआप सेव्ह करण्याची सवय असलेल्या युजर्सनी या बदलाची नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र, यापूर्वी Google Photosमध्ये बॅकअप झालेले फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित असल्याने त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही.







