मालवणात सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात
मालवण (प्रतिनिधी) :
संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा अस्थिर परिस्थितीत समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे वामन परब यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने मालवण येथील दैवज्ञ भवन येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. महोत्सवाची सुरुवात श्री व्यासपूजन तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमात सनातन संस्था आणि संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्यावर आधारित लघुपट प्रदर्शित करण्यात आला. तसेच डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन, धर्मरक्षक व हिंदुनिष्ठांचा सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्य स्थापनेचा संकल्प आणि सामूहिक नामजप असे विविध उपक्रम पार पडले.
यावेळी आगामी जागतिक युद्धाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रथमोपचार, अग्निशमन आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. देशातील पोलीस दलाची मर्यादित संख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सक्षम होण्याची गरज असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
साधनामय जीवनात अहंकाराचे निर्मूलन अत्यंत आवश्यक असून, श्रीगुरू आणि भगवंतांच्या चरणी स्वतःला अर्पण करणारेच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
यंदा सनातन संस्थेतर्फे मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगू आणि मल्याळम् आदी भाषांमध्ये देशभरातील ८१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, देवगड, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथेही महोत्सव उत्साहात पार पडला. ऑनलाईन प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा देश-विदेशातील हजारो भाविकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमात गुरुपूजन पंकज नेरकर (कोळंब) यांनी केले, तर पौरोहित्य सतीश वझे यांनी केले. सूत्रसंचालन तन्वी परब यांनी केले. प्रमुख वक्ते वामन परब यांचे स्वागत ॲड. हेमेंद्र गोवेकर यांनी केले. भाजपचे नगरसेवक मंदार केणी, शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर, भाजप नगरसेविका महानंदा खानोलकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर यांच्यासह ॲड. गिरीश गिरकर, समीर गवाणकर, ऐश्वर्य मांजरेकर, डॉ. अविनाश झांटये, शिल्पा झांटये आणि अनेक मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






