मालवण, प्रतिनिधी :
बदलत्या व्यावसायिक धोरणांमध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासनाने अन्न व्यवसायासाठी निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव राजू जठार यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात अन्नसुरक्षा प्रशिक्षण पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरणार असून, त्याचे श्रेय अन्न प्रशासन, व्यापारी महासंघ तसेच तालुका व ग्रामीण व्यापारी संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांना जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आचरा येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या वतीने अन्न व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा (FoSTaC) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल सिरॉकच्या लौकीक सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, महासंघाचे माजी कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे कार्यवाह विवेक नेवाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, माजी सरपंच मंगेश टेमकर, अन्नसुरक्षा प्रशिक्षक अंकुश जोगदंड, उपाध्यक्ष मंदार सांबारी, परेश सावंत, खजिनदार जयप्रकाश परूळेकर, राजन पांगे, संदीप पांगम, गजानन गावकर, शैलेश वळंजू, सचिन गुळगुळे, सचिन हडकर, विकास साटम, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांच्यासह सिंधुदुर्ग आणि राजापूर येथील मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
प्रशिक्षक अंकुश जोगदंड यांनी अन्न सुरक्षा कायदा, परवाना, स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण तसेच अन्न व्यवसायातील कायदेशीर जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले.
कार्यक्रमास आचराचे सरपंच जेरॉन फर्नांडिस आणि उपसरपंच संतोष मिराशी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार सांबारी यांनी केले.






