मालवण | प्रतिनिधी
क्रिकेट हा केवळ खेळ नसून समाजाप्रती असलेली जबाबदारीही तेवढीच महत्त्वाची आहे, या भावनेतून गुडमॉर्निंग क्रिकेट संघाने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
उपक्रमादरम्यान मैदान परिसरात भविष्यात घनदाट सावली देणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित परिसराची निर्मिती आणि भावी पिढीला स्वच्छ, निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित सदस्यांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही केला.
गुडमॉर्निंग क्रिकेट संघ हा केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न राहता सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय उपक्रम राबवत आहे. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, धावण्याच्या स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग, गरजू नागरिकांना मदतीचा हात, रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत संघाने परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या वृक्षारोपण उपक्रमासाठी संघाचे मार्गदर्शक तथा उद्योजक नितीन वाळके यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेतून पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याची भावना संघाच्या सदस्यांनी व्यक्त केली.
यापुढेही “खेळासोबत समाजसेवा” हा संदेश कृतीतून जपत पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार गुडमॉर्निंग क्रिकेट संघाने व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनीही संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांतून इतर युवक संघटनांनी प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.







